पावसाची ६४ टक्के तूट; सिद्धेश्वर धरणात अवघा ३२ टक्के जलसाठा.!

Spread the love

लाभक्षेत्रातील गावांवर पाणीटंचाईचे सावट; खरीप पिकेही धोक्यात, शेतकऱ्यांची दमदार पावसाकडे नजर

हिंगोली, ता. २० (प्रतिनिधी) : Siddheshwar Dam पावसाळ्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपत आला तरी सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल ६४ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली असून, औंढा नागनाथ, वसमत ,पुर्णा, नांदेड तालुक्यातील अनेक गावं शहरांचा मोठा आधार असलेल्या सिद्धेश्वर धरणात केवळ ३१.६९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या काही प्रमाणातील पावसामुळे खरीप पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दोन दिवसांपासून काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या असल्या तरी जिल्ह्याला अपेक्षित असलेला दमदार पाऊस अद्याप झालेला नाही.

ऑगस्ट महिन्यात सरासरी १४० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ५०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच सरासरीच्या केवळ ३६ टक्के पाऊस झाला असून ६४ टक्के तूट कायम आहे. पावसाच्या या लहरीपणाचा थेट परिणाम सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि हळद या प्रमुख खरीप पिकांवर होत आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटत असून, ढगाळ वातावरणामुळे रोगराईचाही प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे.औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण जुलै महिन्यापर्यंत मृतसाठ्यावर पोहोचले होते. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे मृतसाठ्यातून पाणीपातळी वाढली असली तरी सध्याचा जलसाठा अवघा ३१.६९ टक्क्यांवर असल्याने भविष्यातील गरजा भागविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सिद्धेश्वर धरणावर अवलंबून असलेल्या अनेक गावांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे. येत्या काळात पाऊस अपेक्षित प्रमाणात झाला नाही, तर सिंचनासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनू शकतो. खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी आणि धरणातील जलसाठा वाढविण्यासाठी आता दमदार पावसाची नितांत गरज आहे.दरम्यान, पावसाळ्याचे अजून काही दिवस शिल्लक असल्याने येत्या दोन महिन्यांत समाधानकारक आणि व्यापक पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. मात्र, पावसाने अशीच दडी मारली तर हिंगोली,परभणी, नांदेड जिल्ह्यावर भविष्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.

You cannot copy content of this page