माणुसकी हरवलेल्या नवरोबाने दिड लाखांसाठी पत्नीला मुलीसह घराबाहेर हाकलले
लग्नात ५ लाख हुंडा,३ तोळे सोनं देऊनही पठ्ठयाचं झालं नाही समाधान;पूर्णा पोलिसांत पतीसह सासरच्या चार मंडळीं विरोधात गुन्हा दाखल
पूर्णा(प्रतिनिधी)
माणुसकी हरवलेल्या माणसाला पैश्या पुढे घर,संसार, पत्नी,मुलंबाळं यांचं काहीही घेणं देणं राहीलेले दिसत नाही.त्यासाठी माणुस कोणत्याही थराला जाऊ लागला आहे.तीन वर्षांपूर्वी झालेल्या लग्नात वधुपित्याने मुलीचा संसार सोन्याचा व्हावा यासाठी जावयास ५ लाख रुपये रोख हुंडा,३ तोळे सोन्याचे दागिने,लाखों रुपयांचा खर्च करून संसार साहित्य देऊन थाटामाटात लग्न लावून दिले.मात्र एवढ्यावर जावयाचं काही समाधान झालेच नाही.लग्नानंतर पोटाला कन्यारत्न जन्मले म्हणुन,तसेच बायकोला शेतातील, घरातील कामं येत नाही म्हणून सतत मारहाण करून,तीला शिवीगाळ करून त्रास देत आणखी माहेराहून दुचाकी खरेदी साठी दिड लाख रुपये घेऊन ये म्हणून पत्नीला दोन वर्षांच्या मुलींसह घराबाहेर हाकलून दिल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना पूर्णा तालुक्यातील हटकरवाडी येथे घडली आहे.एवढंसारं होऊनही नवरा नांदायला घेऊन जाईल या आशेने वर्षभरात आईवडीलाकडेच राहुन नवरा नांदायला नेणारच नसल्याने कंटाळून विवाहीतेने अखेर पोलीसांकडे दाद मागितली आहे.पोलीसांनी पिडीत महीलेच्या फिर्यादीवरुन पती,सासु सासरा,ननंदबाई विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महीनाभरपुर्वी बरबडी येथे घडलेली हुंडाबळीची घटना ताजी असतानाच आता तालुक्यातील हटकरवाडी येथे अशीच काहीशी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.रूपाली सिध्देश्वर मुलगीर वय 22 वर्षे रा.हटकरवाडी ता. पूर्णा ह.मु. महातपुरी ता. गंगाखेड जि. परभणी या तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या विवाहीतेने आपल्या नवरा सिद्धेश्वर मुलगीर, निर्मला मुलगीर, सुरेश मुलगीर, ननंदबाई कावेरी सौदागर यांच्या विरोधात पूर्णा पोलिस ठाण्यात तुला मुलगी कशी काय झाली, शेताचे काम,घरचे काम येत नाही असे म्हणुन सासु, सासरे व ननंद यांनी नेहमी शिवीगाळ करुन मानसिक त्रास देत असत. नवरा छोटया मोठ्या कारणावरुन मारहाण करून शारीरीक व मानिसक देत तुझ्या माहेरहुन मोटारसायकल घेण्यासाठी दिड लाख रूपये मला आणुन दे म्हणून असे म्हणत दोन वर्षांच्या मुलगी स्नेहासह तीला घराबाहेर हाकलून दिले.अशी फिर्याद दाखल केली.यावरुन पोलीसांनी वरील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपास सपोउपनि रमेश मुजमुले करत आहेत.
प्रबोधन,जनजागृतीची गरज…!
सध्याच्या युगात मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे दुरापास्त झाले असल्याचे बोलले चित्र आहे.यातुनही ज्याला मुलगी मिळतें त्यांना मात्र याची काही किंमत उरली नाही.माणुसकी हरवल्या गत काही बेअक्कली लोक आजही दुसऱ्याच्या लेकीबाळींला चार पैशासाठी नको नको तेवढा त्रास देत आहेत.अश्या त्रासापाई काही लेकी तर मरणाला देखील कवटाळीत आहेत.मागील काही दिवसांत अश्याच काही घटना पूर्णा तालुक्यात सुहागन, बरबडी येथे घडल्या आहेत.तर पैशासाठी पत्नीचा छळ करणा-यासांची संख्या लक्षणीय होत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी महीला बालविकास विभाग व पोलीसांच्या महीला सुरक्षा विभागाच्या वतीने महीलांच्या कौटुंबिक छळाबाबत प्रबोधन ,जनजागृती मोहीम हाती घ्यावी अशी मागणी होत आहे.












