परभणीत संतप्त शिवप्रेमींनी काढला जिल्हाकचेरीवर मोर्चा
*शेकडो शिवप्रेमींचे जिल्हाधिकार्यांंना निवेदन;पेडगाव येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध*
परभणी/प्रतिनिधी
तालुक्यातील पेडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सोमवारी (दि.3) सायंकाळी 8 वाजता वाढदिवस साजरा करणार्या मुलांनी केकची फेकाफेक करीत पुतळा परिसराची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमींच्या वतीने बुधवारी (दि.5) परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाज कार्यलयापासून मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मराठा आरक्षण समन्वय समितीचे सुभाष जावळे, मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख, संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गजानन जोगदंड, पेडगावचे सुहास देशमुख, प्रीती घुले, व्यंकटराव शिंदे यांंच्यासह शेकडो शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.