नानलपेठ पोलीस ठाण्याचा कारभार महिलांच्या हाती
जागतिक महिला दिनानिमीत्त राबविला उपक्रम
परभणी/प्रतिनिधी
जागतिक महिला दिनी शनिवारी (दि.8) कर्तव्य बजावणा-या महिलांंचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून जिल्हयातील पोलीस ठाणे स्तरावर विविध कार्यक्रम व उपक्रमांंचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी नानलपेठ येथे संपूर्ण दिवस हा महिलांनी पोलीस ठाण्यातील कामकाजाची जबाबदारी पार पाडून महिला दिन साजरा करण्यात आला. त्यामध्ये नानलपेठच्या प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्वाती कावळे, ठाणे अंमलदार म्हणून पोलीस अंमलदार करुणा मालसमिन्दर, स्वागत कक्ष अधिकारी म्हणून म.पो.अं. शामल धुरी, क्राईम राईटर म्हणून म.पो.अं. शेख निशाद, गोपनिय शाखेच्या प्रभारी म्हणून म.पो.अं.सुनंदा साबणे, सीसीटीएनएसचे कामकाज म.पो.अं. अंजली हेंद्रे, हजेरी मेजर म्हणून म.पो.अं.श्यामबाला टाकरस यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच पोलीस ठाण्यातील इतर सर्व कामकाजाच्या ठिकाणी महिला पोलीस अंमलदार यांची नेमणुक करण्यात येवून पोलीस ठाण्याचे कामकाज चालविण्यात आले.
तसेच पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या संकल्पनेतून नानलपेठ ठाण्यात महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या करिता त्यांनी कर्तव्य बजावत असताना घ्यावयाची आरोग्याची काळजी व त्यांच्या इतर आरोग्यविषयक समस्या या विषयावर डॉ. आशा पवन चांडक यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
गंगाखेड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या उपस्थितीत महिला दक्षता समितीतील महिलांचा व पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदारांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला व त्यांच्या हस्ते पोलीस ठाणे परिसरात पिपळाची रोपे लावण्यात आली.
सोबतच जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर कार्यरत सर्व महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आले. तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, ठाणे अंमलदार यांच्यासह इतर महत्वाच्या कर्तव्याच्या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली होती.