परभणी(प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीच्या परभणी महानगर जिल्हा अध्यक्षपदी माजी नगरसेवक शिवाजीराव भरोसे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पातळीवरील निवडणूक निर्णय अधिकार्यांनी निवड जाहीर केली आहे.
भारतीय जनता पार्टी अंतर्गत महानगर जिल्हाध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्ष या दोन प्रमुख पदांकरीता पक्षाद्वारे गेल्या एक महिन्यापासून संघटनात्मक निवडणूकीचा कार्यक्रम सुरु होता. त्यातून पक्षाने या दोन्ही पदाच्या निवडीकरीता कोअर कमिटी स्थापन केली. या कमिटीच्या माध्यमातून श्रेष्ठींनी प्रत्येकी सदस्यांकडून तीन इच्छुकांची नावे मागविली. प्रदेश कार्यालयाने ती नावे स्विकारल्यानंतर त्या नावातूनच महानगर जिल्हाध्यक्षपदी भरोसे यांची निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाद्वारे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिली.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून आनंद भरोसे हे विधानसभा निवडणूकीपूर्वी पर्यंत कार्यरत होते. कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर त्यांचेच समर्थक राजेश देशमुख यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विधानसभा निवडणूकीत परभणी मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटास सुटल्यानंतर भरोसे हे शिंदे गटाकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे त्यांचे व भाजपचे संबंध संपुष्टात आले होते. परंतु, त्यांचे बंधू शिवाजीराव भरोसे यांनी आपण भाजपमध्येच असल्याचा दावा करीत या पदाकरीता मोर्चेबांधणी सुरु केली. दोन वेळा नगरसेवक पद भूषविलेल्या भरोसे यांना पक्षांतर्गत ज्येष्ठ नेतेमंडळींनी भक्कम पाठींबा दिला. त्यामुळे ते या स्पर्धेत आघाडी मारु शकले. महानगर जिल्हाध्यक्ष पदाकरीता डॉ. केदार खटींग, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे, सुनील देशमुख, सुरेश भुमरे वगैरे नेतेमंडळींची नावे आघाडीवर होती. वाकोडकर यांनी आपण महानगर जिल्हाध्यक्ष पदास उत्सुक नाही, असे स्पष्टपणे पक्षश्रेष्ठींना कळविले होते. तर उद्योग आघाडीच्या एका शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून वाकोडकर यांची महानगर जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावण्याऐवजी उद्योग आघाडीची पुन्हा जबाबदारी द्यावी, असा आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर वाकोडकर यांच्याऐवजी अन्य पर्यायी नावांबाबत चर्चा सुरु झाली. त्यात डॉ. केदार खटींग, सुनील देशमुख, सुरेश भुमरे, मधुकर गव्हाणे आदींबाबत प्रामुख्याने चर्चा झाली.