महसूल विभागाच्या धाडीत दोन टिप्पर जप्त..
पूर्णा महसूल विभागाची कानडखेड, चुडावा शिवारातील कारवाई; दोन वाहनांना ३ लाखांचा दंड
पूर्णा ता.३(प्रतिनिधी)
येथील महसूल विभागाचे तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या पथकाने तालुक्यातील चुडावा व कानडखेड शिवारात मंगळवार ता.३ रोजी पहाटेच्या सुमारास छापेमारी केली.या कारवाईत पथक प्रमुख ना.त.प्रशांत थारकर यांनी वाळूची तस्करी करणाऱ्या दोन टिप्परला ताब्यात घेऊन सुमारे ३ लाख रुपयांची दंडात्मक केली आहे.
पूर्णा तालुक्यात बांधकामास लागणा-या वाळूचे दर गगनाला भिडल्यामुळे मोठ्या प्रमाणात रेती तस्कर अवैध रित्या वाळूचा उपसा करुन विनापरवाना वाळूची वाहतूक करत आहेत.स्थानिक महसूल विभागाच्या वतीने उप विभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या आदेशाने तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी आपली पथकं स्थापन केली आहेत.सोमवारी मध्यरात्री पथक प्रमुख ना.त.प्रशांत थारकर हे तलाठी सिद्धार्थ खिल्लारे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे पोकाॅ.राठोड,चुडावा पोलिस ठाण्याचे पोकाॅ.केंद्रे यांना सोबत घेऊन रात्र गस्तीवर होते.पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चुडावा जवळील रेल्वेच्या अंडरग्राऊंड पुलाजवळ त्यांनी एम.एच. २५/बी/९५६८ क्रमांकाच्या वाळू घेऊन जात असलेल्या टिप्परला आडवले त्यास वाहनातील वाळूचा परवाना विचारला असता चालक टिप्पर जागीच सोडून पसार झाला.तर दुसरी कारवाई करण्यासाठी पहाटे ४;३० सुमारास ताडकळस रस्त्याने जात असताना पथकाने कानडखेड शिवारातील महामार्ग क्रमांक ६१ वर एम.एच.२०/एफ/५२८१ क्रमांकाच्या टिप्परला वाळूची तस्करी करताना रंगेहाथ पकडले.सदरील दोन्ही टिप्पर पुर्णा तहसील कार्यालयात पथकाने कारवाई करण्यासाठी जमा केले आहेत. तहसिलदार माधवराव बोथिकर यांनी सदरील दोन टिप्पर मालकांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी १लाख ५० हजार प्रमाणे दंड ठोठावला असल्याचे समजते.