पूर्णेत बकरीद ईद उत्साहात साजरी
पूर्णा (प्रतिनिधी)
भारताची सांस्कृतिक विविधता आणि सहिष्णुतेची परंपरा जपणारा बकरीद ईदचा सण पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा असलेला हा सण प्रेम, दया, समता आणि बंधुता यांचा संदेश घेऊन आला. शहरातील ईदगाह येथे आयोजित सामूहिक नमाज पठणाच्या कार्यक्रमात प्रशासनाच्या अधीका-यांसह स्थानिक समाजसेवक, पत्रकार आणि प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहुन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या .
पूर्णा शहरात बकरी ईदच्या दिवशी येथिल ईदगाह मैदानावर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सामुहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मौलाना शमीम रिजवी यांनी देशात शांतता, सुव्यवस्था आणि परस्परांमधील भाईचारा अबाधित राहावा, यासाठी विशेष प्रार्थना केली. त्यांनी उपस्थितांना प्रेम आणि एकतेचा संदेश देताना, समाजातील सर्व घटकांनी एकमेकांच्या परंपरांचा आदर करावा, असे आवाहन केले. नमाज पठणानंतर उपस्थितांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.