सुरवाडी शिवारातील शेतरस्त्याची वहीवाट झाली मोकळी
महसूल,पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थी आली फळाला
पूर्णा ता.१३(प्रतिनिधी)
मागील अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या तालुक्यातील माटेगांवच्या शेतकऱ्यांचा सुरवाडी शिवारातील शेतरस्त्याचा वाद पूर्णा महसूल व पोलीस प्रशासनाच्या माध्यस्तीने मार्गी लागला आहे . प्रशासनाने ता.१२ रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शेत रस्ता मोकळा करून दिला आहे.यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची रस्त्यापायी होत असलेली कोंडी आता दुर होणार असल्याने शेतकऱी वर्षातुन समाधान व्यक्त केले जात आहे.
पूर्णा तालुक्यातील अनेक गाव शिवारात शेतकऱ्यांच्या धु-यांचे, पाऊल वाटेचे नंबर धुरा ,गाडीवाट,पाऊलवाट बाबत असलेले वाद सामोपचाराने मिटवून रस्ते मोकळे करुन देण्यासाठी पूर्णा महसूल विभागाने चंग बांधला आहे.मागील दिड ते दोन वर्षात उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तसेच तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाच्या नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी, तलाठी यांनी दोनशे हुन अधिक प्रकरणात यशस्वी मध्यस्थी करत कायमस्वरूपी तोडगा काढला आहे.
पूर्णा तालुक्यातील मौजे माटेगांव येथील शेतकरी सोपान परडे व ईतर तसेच हरिभाऊ सातपुते व ईतरांत मागील अनेक वर्षांपासून सुरवाडी शिवारात असलेल्या गट नं.१८२,१८३,१८४,१८५ मधून जाणाऱ्या नंबर धु-याबाबत वाद होत होता सदरील प्रकरणात महसूल विभागाच्या वतीने गुरुवारी १२ रोजी महसूल विभागाचे नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे,मंडळ अधिकारी के.पी.शिंदे, तलाठी खिल्लारे, तलाठी बनसोडे यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक आमेर चाऊस, पोहेकाॅ.तोंडेवाड, पोकाॅ.अक्कलवाड,पोकाॅ.शिंदे, भुमि अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिवारात असलेल्या वादाबाबत दोन पक्षकारांत सामंजस्य घडवत ८.१५ फुट नंबर धु-याची आखणी केली.यानंतर संबंधित जागेवर जेसीबी साह्याने खोदकाम करुन रस्ता वहीवाटीसाठी मोकळा करून दिला आहे.