पूर्णेतील कन्या शाळेत स्वखर्चाने स्वच्छतेचा व वृक्षारोपणाचा उपक्रम
पत्रकार केदार पाथरकर यांचे स्तुत्य योगदान;शाळा परिसरात सौंदर्य व स्वच्छतेचा नवा आदर्श
पूर्णा ता.५ (प्रतिनिधी)येथील जुना सरकारी दवाखाना परिसरातील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचा परिसर सुमारे काही दिवसांपासून कचरा आणि दुर्गंधीमुळे अत्यंत अस्वच्छ स्थितीत होता. हे दृश्य पाहून पत्रकार केदार पाथरकर यांचे मन हेलावले आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेत या परिसराचे रूप पालटण्याचे ठरविले.
केवळ विचाराने नाही, तर प्रत्यक्ष कृतीने उदाहरण घालून देत पाथरकर यांनी आपल्या स्वखर्चातून स्वच्छता मोहीम राबवली. त्यांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिसरातील कचरा साफ केला आणि मुलांना बाथरूमपर्यंत जाण्यासाठी २ फूट रुंद व १०० फूट लांब रस्ता तयार केला.या उपक्रमात गजानन कदम, परिसरातील रहिवासी ठाकूर, शाळेतील माजी विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. परिसरातील झाडांना संरक्षित ठेवण्यासाठी लोखंडी ट्री गार्ड बसवण्यात आले. झाडांना नियमित पाणी देणे, रस्त्यावर पाणी मारणे यासारखी कामे रविवारी सुट्टीच्या दिवशीही करण्यात आली.हा उपक्रम केवळ स्वच्छता व सौंदर्यीकरणापुरता मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीचे भान जपणारा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला आहे. या स्तुत्य कार्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.












