जनावर चोर टोळीचा पर्दाफाश; परभणी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

Spread the love

जिल्ह्यातील १५ जनावर चोरीच्या गुन्ह्यांची उकल; मांस विक्रीतून मिळालेले ९ लाख रुपये जप्त

परभणी, ता. ७ (प्रतिनिधी) : Cattle thief gang busted;परभणी जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात सातत्याने घडत असलेल्या जनावरे चोरीच्या घटनांचा छडा लावत परभणी स्थानिक गुन्हे शाखेने जनावर चोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या एकूण १५ जनावर चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, चोरीच्या जनावरांची कत्तल करून मांस विक्रीतून मिळालेले तब्बल ९ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशान्वये परभणी शहर व ग्रामीण भागातील जनावरे चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला जनावरे चोरी करणाऱ्या टोळीबाबत गोपनीय माहिती मिळाली. प्राप्त माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित मुजाहिद ख्वाजा कुरेशी (वय २६, रा. धार रोड, परभणी) यास ताब्यात घेण्यात आले.त्यास विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने परभणी शहरासह पालम, गंगाखेड, मानवत, पाथरी आणि चारठाणा परिसरात जनावरे चोरीचे एकूण १५ गुन्हे केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या टोळीने नानापेठ, परभणी ग्रामीण, पालम, मानवत, गंगाखेड, नवामोंढा, पाथरी आणि चारठाणा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जनावरे चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.तपासादरम्यान चोरी केलेल्या जनावरांची कत्तल करून मांस विक्रीतून मिळालेली ९ लाख रुपयांची रोख रक्कम आरोपीने पोलिसांकडे हजर केली. ही रक्कम कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणात शेख अकबर शेख शौकत (रा. भिवंडी, ह.मु. जिंतूर), नदीम (रा. सेलू) आणि अशफाक (रा. सेलू) हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. मुख्य आरोपी मुजाहिद ख्वाजा कुरेशी यास पुढील तपासासाठी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या कारवाईत पोउपनि गणेश सवंडकर, चंदनसिंह परिहार, श्रेणी पोउपनि मधुकर चट्टे, सपोउपनि सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, तसेच पोलीस कर्मचारी सिद्धेश्वर चाटे, सूर्यकांत फड, नामदेव डुबे, विलास सातपुते, लटपटे, माणिक डुकरे, अनिल राठोड, जयश्री आव्हाड, मुकेश बुधवंत, पांडुरंग तूपसुंदर, चव्हाण, पौळ, ढवळे, पुरी, परसोडे, गीते, चालक पोलीस हवालदार उत्तम हनवते तसेच तांत्रिक सहाय्यक सपोउपनि बालाजी रेड्डी यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

You cannot copy content of this page