Pathariकावड यात्रेतील भाविकांना कारने चिरडले;दोघांचा मृत्यू, चार जखमी
पाथरी ता.११(प्रतिनिधी)
(Pathari-Selu Road)पाथरी-सेलू रस्त्यावरील खेडूळा पाटीजवळ भरधाव कार कावड यात्रेत घुसल्याने या भीषण अपघातात कावड यात्रेतील दोन जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता.११) पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
श्रावण सोमवार निमित्त सेलू येथून पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे २५० कावड यात्रेकरू आले होते. मध्यरात्री रामपुरी येथे थांबून पहाटे कावड यात्रेकरू परतीच्या प्रवासाला निघाले. पाथरी शहराबाहेर आल्यानंतर सेलूकडे मार्गक्रमण करत असताना खेडूळा पाटीजवळ पहाटेच्या सुमारास एम. एच. ०३ सी. एच. १२११ या क्रमांकाची कार थेट यात्रेत घुसली. हा अपघात एवढा भीषण होता की, या धडकेत ऋषिकेश अशोक शिंदे (रा. सेलू, वय १६ वर्षे) व एकनाथ गंगाधरराव गजमल (रा. डासाळा, ता. सेलू वय ५० वर्षे) हे जागीच ठार झाले. तर प्रभू तेवर, कृष्णा केशव भोसले, धनराज शाम खेडकर व कृष्णा डोळझापे हे गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर सेलू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाथरी पोलिस ठाण्याचे स. पो. नि. सोमनाथ नरके, जैस्वाल, थोरे आणि इतर कर्मचारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वाजता घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी मयत एकनाथ गंगाधर गजमल यांचे बंधू भुजंग गंगाधर गजमल यांनी पाथरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून कारचा चालक गजानन खंडागळे याच्याविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस पुढील तपास करत आहेत.
श्रावण महिन्या निमित्त अखंड हिंदू राष्ट्र समितीच्यावतीने हे कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यात सेलू तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पाथरीतील अपघातामुळे दोन भाविकांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण सेलू शहर व डासाळा गावावर शोककळा पसरली.












