राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नुकसान भरपाईची मागणी
ताडकळस, कात्नेश्वर,वझुरसह, लिमला महसूल मंडळात अतीवृष्टी लिमल्यात चार दिवसांत १८०.८ मिलीमीटर पाऊस..!शेतजमीन, पिके, शेती अवजारांचे प्रचंड नुकसान; अनेकांच्या घरात पाणी शिरले
पूर्णा ता.१६(प्रतिनिधी)तालुक्यातील ताडकळस,कात्नेश्वरसह लिमला महसुल मंडळातील गावांत मोठ्या प्रमाणात अतीवृष्टी झाल्याची नोंद आहे.मागील ४ दिवसांपासून लिमला महसुल मंडळातील गावांत तब्बल १८० मीमी पाऊस कोसळला आहे.अतिवृष्टी मुळे नदीकाठची शेतजमीन पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने खरडून गेली, पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, उस, कापूस व खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः लिमला महसूल मंडळातील देउळगाव दुधाटे, मुंबर, गोळेगाव, माहेर या शिवारात ढगपुटी झाल्यामुळे या भागातील पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. तर नद्यांना पूर आल्याने नदीकाठची पिके पुर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.
शनिवारी (ता.१६) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भरपावसात तालुका अध्यक्ष अशोक बोकारे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी तहसिल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. अतीवृष्टीमुळे पिकांचे नुकसानीचे तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड,घरात पाणी शिरुन संसार उघड्यावर पडलेल्या जनतेच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची भरिव तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर तालुका अध्यक्ष अशोक बोकारे, सरपंच गजानन अंबोरे, गजानन कदम, तुकाराम चव्हाण, तुकाराम लोखंडे, अँड.गोविंद शिंदे ,मुंजा जाधव, सुदामराव तांबे, गोविंद धवन,आंबादास भौरे,मारोती लोखंडे ,नवनाथ काळबांडे आदीं शेकडो पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.












