परभणीत नविन अग्निशमन केंद्रास निधी मंजुर;आ.डॉ.राहुल पाटीलांच्या पाठपुराव्याला यश
परभणी ता.२२(प्रतिनिधी)आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे परभणी शहरात केंद्रीय वित्त आयोग अंतर्गत अग्निशमन सेवांचा विस्तार व आधुनिकरणा साठी असलेल्या योजनेत महापालिकेचा समावेश झाला असून,परभणी महानगरपालिकेला नवीन अग्निशमन केंद्र मंजूर झाले आहे.
परभणी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहरांमध्ये वसमत रोड भागामध्ये नवीन अग्निशमन दलाचे केंद्र स्थापन करावे अशी मागणी मागील अनेक महिन्यांपासून आ.डॉ.पाटील शासनाकडे करत आहेत. त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला आहे. त्यांच्या मागणीची दखल घेत शासनाने वसमत रोडला अग्निशामक दलाच्या नवीन केंद्राला मंजुरी दिली आहे. त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सजात आणि क्षमता निर्माण निधी खिडकीच्या नियोजित वाटपातून राज्यांमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकरण योजनेच्या सूचने नुसार केंद्र शासनाने निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार ही योजना राज्यात राबवण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आली होती यामध्ये परभणी महानगरपालिकेचा ही प्रस्ताव आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पाठवण्यात आला होता त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार परभणी महानगरपालिकेच्या नवीन अग्निशमन सेवा केंद्रासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे वसमत रोड भागामध्ये नवीन केंद्र स्थापन होणार असून वसमत रोड या भागाचा विस्तार पाहता या परिसरामध्ये केंद्र असावे अशी मागणी आमदार डॉ.पाटील यांनी सातत्याने मागील दोन वर्षापासून शासनाकडे लावून धरली आहे त्याला आता यश मिळाले असून निधी मंजूर झाल्याने आता लवकरच नवीन अग्निशामक दलाचे काम देखील सुरू होणार आहे. आधुनिक सामग्री खरेदी करण्यात येणार आहे.तसेच नवीन पदभरती देखील भरण्यात येणार आहे.












