सरसकट पंचनामे करा अन्यथा ८ सप्टेंबर पासुन शेतकऱ्यांचे उपोषण
पुर्णेच्या कळगांव शिवारातील शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदनाद्वारे ईशारा
पुर्णा ता.२६(प्रतिनिधी)पुर्णा तालुक्यातील मौजे कळगाव शिवारात १५ ऑगस्ट रोजी पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथिल शेतकऱ्यांच्या नुmकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा ८ सप्टेंबर पासुन प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार असल्याचे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

कळगाव ता. पूर्णा जि. परभणी येथे नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीने शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. संपूर्ण गावाला या पावसाचा फटका बसला आहे. सर्व पिके पाण्याखाली गेली होती. भरपूर शेतकऱ्यांच्या झोपडीमध्ये सुद्धा पाणी साचले होते. भरपूर ठिकाणी पाणी साचल्यामुळे सोयाबीन पिकाला नुसता पालाच आहे शेंगा गळाल्या आहेत. कापूस पिक आडवे झाले आहे. यापूर्वी निवेदन दिल्यावर त्रिस्तरीय समिती आली असता कमी प्रमाणात पंचनामे करत आहेत. त्याला आमचा गावकर्याचा विरोध आहे. यात तहसीलदारांनी योग्य ती दखल घेऊन त्वरित सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत.अन्यथा येथिल तहसील कार्यालयासमोर (ता.८) रोजी पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शेकडो कळगांव येथिल शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.












