बँकेची रोकड,दुचाकी, मोबाईल लुटणारा चोरटा जेरबंद
परभणी स्थानिक गुन्हा शाखेची धडाकेबाज कामगिरी
पुर्णा ता.९(प्रतिनिधी) Parbhani Police (LCB) News चुडावा तसेच ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवून दुचाकी, मोबाईल व रोख रक्कमसह बँकेची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांस स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाच्या कारवाईत जेरबंद झाला आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली दोन मोटारसायकली, मोबाईल फोन आणि १५ हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चोरींच्या घटनात पोलीसांनी योग्य दिशेने तपास करुन गोविंद अंकुशराव वारकड (रा. सारंगी, ता. पूर्णा) या चोरट्यांस निष्पन्न केले होते.स्थानिक गुन्हा शाखेचे पथक सदरील चोरट्याच्या शोधत होते.पोलीसांनी सापळा रचून त्यास अटक केली. प्राथमिक चौकशीत त्याने केवळ ताडकळस येथीलच नव्हे तर चुडावा येथील लुटीतही सहभाग असल्याची कबुली दिली.लक्षवेधी बाब म्हणजे, मागील वर्षी ७ डिसेंबर रोजी पूर्णा येथून चुडावा शाखेकडे रोकड घेऊन जाणाऱ्या मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्यास अडवून मारहाण करीत त्यांचे जवळील रोकड लंपास करण्यात आली होती. त्यावेळीही आरोपींनी चाकूचा धाक दाखवून रोकड लांबविली होती, असे चौकशीत उघड झाले आहे.
सदरील गुन्हे उघडकीस आल्यानंतर चोरट्यांकडून पल्सर मोटारसायकल (क्र. एच.एच.२२ एझेड ९२६०), ओपो कंपनीचा मोबाईल फोन, चोरीस गेलेली हिरो होंडा मोटारसायकल आणि १५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या देखरेखीखाली पार पडली. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, सहा. पोलिस निरीक्षक मधुकर चटे तसेच अंमलदार निलेश भुजबळ, रंगनाथ दुधाटे, पांडुरंग तुपसुंदर, राहुल परसोडे, लक्ष्मण कांगणे, गजानन क्षीरसागर, परसराम गायकवाड, शरद सावंत आणि सायबर पोलिस ठाण्याचे बालाजी रेड्डी व गणेश कौठकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे केली.दरम्यान, आरोपीस पुढील तपासासाठी ताडकळस पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात दिलासा व्यक्त केला जात असून, पोलीसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.












