मराठवाडा मुक्तिसंग्रामात परभणीच्या अनेकांनी रक्त सांडले:पालकमंत्री मेघना बोर्डीकर

Spread the love

परभणीत ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन;अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत – आश्वासन

परभणी,ता.(प्रतिनिधी)– मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण राहिले आहे. जिल्ह्यातील असंख्य तरुणांनी निजामाच्या सत्तेविरुद्ध जिद्दीने लढा देत रक्त सांडले आणि अनेकांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागाच्या प्रेरणेने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करूया, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

परभणी येथील राजगोपालचारी उद्यान येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७७व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम झाला. या वेळी खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्म्यांच्या स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, परभणी जिल्ह्यातील चारठाणा, वालूर, ब्राम्हणी, माळसोन्ना आदी गावांतील स्वातंत्र्यसैनिकांनी मुक्तिसंग्रामात मोलाची भूमिका बजावली. पुरुषांसोबतच महिलांचेही योगदान विशेष ठरले. अखेरीस भारतीय सैन्याच्या “ऑपरेशन पोलो” मोहिमेनंतर निजामशाहीचा अंत झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले.

यंदाच्या पावसामुळे जिल्ह्यात समाधानकारक परिस्थिती असली तरी काही भागांत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्याची शासनाने दखल घेतली असून बाधितांना तातडीने मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान “सेवा पंधरवडा” राबविण्यात येणार असून महसूल, कृषी, आवास आदी योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. तसेच मराठा आंदोलनात मृत पावलेल्या नऊ जणांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि नोकरी देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली.त्याचप्रमाणे राष्ट्रीय पोषण महा अभियान, वृक्षलागवड, सौरऊर्जा योजना, युवकांसाठी रोजगार मेळावे व शासकीय कर्ज व्याज परतावा योजना या उपक्रमांद्वारे जिल्ह्याचा विकास गतीने होईल, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिक, वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

You cannot copy content of this page