‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धेत परभणीच्या बालकराकारांचा शिवचरित्रावर पोवाडा
परभणीतील बालकलाकारांची मुंबईत धडाकेबाज कामगिरी
परभणी, दि. १७ (प्रतिनिधी) :
बालरंगभूमी परिषद, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धेत परभणीतील तेजोमय प्रतिष्ठानच्या बालकलाकारांनी लक्षणीय कामगिरी बजावत सर्वांचे मन जिंकले.
१२ व १३ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडलेल्या अंतिम फेरीत या बालकलावंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित पोवाडा सादर केला. अफजलखान वधाचा प्रसंग साभिनय उभा करून बालकलाकारांनी रंगमंचावर शिवरायांचा पराक्रम जिवंत केला. त्यांच्या दमदार अभिनयाला परीक्षक व प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.याआधी ऑगस्ट महिन्यात झालेल्या जिल्हास्तरीय फेरीत परभणीतील तेजोमय प्रतिष्ठानच्या पोवाड्याची राज्यस्तरावर निवड झाली होती.
मुंबईतील अंतिम फेरीत कु. सई चिटणीस, स्वामिनी धारासुरकर, सर्वेश चिटणीस, स्वरा कुलकर्णी, प्रथमेश कुलकर्णी, अक्षज चिटणीस, प्राची धामणगावे, मंगलकुमार धामणगावे या बालकलाकारांनी सहभाग नोंदवला. यांना श्री. आशिष चिटणीस (वाद्यसाथसंगत) व दिनकर देशपांडे (निर्मिती प्रमुख/वाद्यसाथ) यांचे मार्गदर्शन लाभले. बालकलाकारांच्या यशस्वी सादरीकरणाबद्दल बालरंगभूमी शाखा परभणीचे अध्यक्ष आबा ढोले, प्रमुख कार्यवाह त्र्यंबक वडसकर, कार्याध्यक्ष उपेंद्र दुधगावकर, कोषाध्यक्ष संजय पांडे, माजी अध्यक्ष किशोर पुराणिक, प्रमोद बल्लाळ, सौ. चिक्षे आदींनी विशेष कौतुक केले.












