पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध-पुर्णेत पत्रकारांचे निवेदन
पूर्णा ता.२२/प्रतिनिधी :
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर २० सप्टेंबर रोजी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भीषण हल्ला केला. स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर झालेल्या या हल्ल्यात दगडफेक, लाथाबुक्के करण्यात आले. यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पत्रकारांवरील वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीसाठी धोकादायक व चौथ्या स्तंभावर घाला घालणारी घटना असल्याचे पत्रकार बांधवांनी निवेदनाद्वारे सांगितले. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार व प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांवर होत असलेले हल्ले असह्य असून शासनाने तातडीने कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :
१) सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी.
२) राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात.
३) भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस व प्रभावी धोरण आखावे.
हे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तहसीलदार पूर्णा यांच्या मार्फत देण्यात आले.
या निवेदनावर व्हाईस ऑफ मीडियाचे पूर्णा तालुकाध्यक्ष नारायण सोनटक्के, कार्याध्यक्ष शिवाजी बोबडे, जिल्हा सहसंघटक आनंद ढोणे, उपाध्यक्ष गजानन नाईकवाडे, सरचिटणीस सलीम सय्यद, शिवबाबा शिंदे, ज्ञानदेव बोबडे, नवनाथ पारवे, विष्णू चापके, संजय पांचाळ, मारोतराव देसाई, गोविंद मोरे, नागेश नागठाणे, कृष्णा काळे, प्रदीप कदम, सदाशिव सूर्यवंशी, सुशील गायकवाड आदी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.











