गंगाखेड;अतिवृष्टीग्रस्त भागाचा आमदार रत्नाकर गुट्टेंनी केला पहाणी दौरा
पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची मागणी; ओला दुष्काळ जाहीर करण्याचा सरकारकडे पाठपुरावा
गंगाखेड ता.२५ (प्रतिनिधी) :
गंगाखेड तालुक्यातील खळी, सुनेगाव, सायाळा आणि परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतशिवार उद्ध्वस्त झाले आहे. या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करताना खासदार रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतजमिनी, पिके, जनावरे, घरे यावर मोठ्या प्रमाणावर संकट कोसळल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहून मन पिळवटून गेले, असे गुट्टे म्हणाले. यावेळी त्यांनी शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी ठाम अपेक्षा व्यक्त केली.पूरग्रस्त भागातील अनेक गावांत तुटलेल्या संपर्कामुळे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुट्टे यांनी वैद्यकीय पथकासह पाहणी केली. आजारी, लहान मुले, महिला यांच्यासाठी आरोग्यसेवा तातडीने पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता, तातडीने सरसकट पंचनामा करून नुकसानभरपाई देणे आणि या भागाला ‘ओला दुष्काळ’ जाहीर करणे आवश्यक आहे, अशी मागणी गुट्टे यांनी केली. “कष्टकरी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. सरकारने पूर आणि आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या घराघरात पुन्हा दिवा लावण्यासाठी तत्परतेने पुढे यावे,” असेही त्यांनी नमूद केले.

या पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, सरपंच शिवाजी पवार, तालुका आरोग्य अधिकारी मनोजकुमार दिक्षित, तहसील व आरोग्य विभागाचे अधिकारी, नगरपालिका कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.











