ओल्या दुष्काळात तेरावा महिना;साडेचार एकरवरील ऊस जळाला
पुर्णा तालुक्यातील अजदापुर येथिल घटना;५ लाखांचे नुकसान;भरपाई देण्याची मागणी
पूर्णा, ता.२९ (प्रतिनिधी)
महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. पूर्णा तालुक्यातील मौजे अजदापुर शिवारात वाकलेल्या विद्युत खांबावरील लोंबकळणाऱ्या वाहिन्यांमध्ये घर्षण होऊन अचानक लागलेल्या आगीत तब्बल साडेचार एकरांवरील उभा ऊस भस्मसात झाला. या आगीत चार शेतकऱ्यांचे मिळून अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून, संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणकडे तातडीने नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

पुर्णा तालुक्यातील मौजे अजदापुर शिवारातील गट नं. १५४ व १५२ मधील शेतकरी नामदेव शिवाजी वैद्य, तुकाराम शिवाजी वैद्य, सौ. कावेरी बालाजी वैद्य आणि सोनाली गोविंद वैद्य यांनी मिळून ४.५ एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. पुढील महिन्यांत ऊस गाळपासाठी तोडणी अपेक्षित असताना सोमवारी (ता.२९) दुपारी दोनच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली.
शेतातून गेलेल्या महावितरणच्या ११ के.व्ही. वाहिनीतील तारेत घर्षण होऊन ठिणग्या पडल्या आणि क्षणार्धात ऊस पेटला. शेतकरी नामदेव चांदणे यांनी घटनेची माहिती देताच ग्रामस्थ धावून आले. विहिरीवरील मोटारींच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, मात्र तोपर्यंत अर्ध्याहून अधिक ऊस जळून खाक झाला.या आगीत मोठे नुकसान सोसावे लागल्याने पीडित शेतकरी नामदेव वैद्य, तुकाराम वैद्य, कावेरी वैद्य व सोनाली वैद्य यांनी महावितरणकडे तातडीने योग्य ती नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी होरपळले
या परिसरातील खांब मागील काही दिवसांपासून वाकलेले असून वाहिन्या लोंबकळत असल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कार्यालयास दिली होती. परंतु अधिकाऱ्यांनी तक्रारींकडे कानाडोळा केला. अखेर या निष्काळजीपणाचा परिणाम शेतकऱ्यांच्या शिवारात उभ्या असलेल्या पिकावर झाला.
“ओल्या दुष्काळात तेरावा महिना.? “
सध्या तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यातच महावितरणच्या वेळकाढूपणामुळे उभा ऊस राखरांगोळी झाला. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.












