पूर्णेत धनगर समाज बांधव आक्रमक; राज्यमार्ग क्र.६१ वर मेंढर सोडून केला रास्तारोको

Spread the love

दोन तास वाहतूक ठप्प;सरकारला दोन दिवसांची अंतिम मुदत

पूर्णा ता.१ (प्रतिनिधी) – धनगर समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्णा येथे मोठे स्वरूप मिळाले. जालना येथे गेल्या १५ दिवसांपासून संघर्षयोद्धा दीपक बोर्‍हाडे उपोषण करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ बुधवारी (दि.१) सकल धनगर समाजाने पूर्णा शहराजवळील ताडकळस टी पॉईंट येथे दोन तास रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन केले.

पुर्णा शहर व तालुक्यातील अनेक गावंतील सकल धनगर समाज बांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समाजबांधवांनी आपल्या पारंपरिक जीवनशैलीचे प्रतीक असलेल्या मेंढ्यांना घेऊन आंदोलनस्थळी उपस्थिती लावली. त्यामुळे आंदोलनाचे चित्र अधिक प्रभावी झाले.चक्काजाममुळे राज्य महामार्ग क्रमांक ६१ वरील वाहतूक तब्बल दीड ते दोन तास ठप्प राहिली. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.मात्र आंदोलनकर्त्यांनी अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांना मात्र मार्ग उपलब्ध करून दिला. या आंदोलनावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

आंदोलनकर्त्यांनी पुर्णा तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४साली मध्ये बारामती येथील महासभेत समाजाला आरक्षणाबाबत दिलेले आश्वासन आजपर्यंत पाळलेले नाही. सत्ता हातात असून शेकडो कॅबिनेट बैठका झाल्या तरी धनगर समाजाला आरक्षणाचा न्याय मिळालेला नाही.दरम्यान, जालना येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारकाजवळ दीपक बोर्‍हाडे यांनी १५ दिवसांपासून जल-अन्नत्याग करून उपोषण सुरू ठेवले आहे. तरीही सरकारने त्यांच्या मागणीवर कोणताही तोडगा काढलेला नाही.,सरकारने पुढील दोन दिवसांत धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावे. दिपक बो-हाडे यांचे उपोषण सोडवावे. अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन उभारले जाईल.असे तहसीलदार पुर्णा यांच्यामार्फत शासनास पाठलेल्या निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page