ताडकळस येथे अवैध रेती वाहतूक;पोलिसांची धडक कारवाई,७.३०लाखांचा मुद्देमाल जप्त
ताडकळस, ता.१० (प्रतिनिधी):
ताडकळस–धनोरा काळे रस्त्यावरील एमएसईबी कार्यालय परिसरात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ताडकळस पोलिसांनी बुधवारी (दि.८) रात्री छापा टाकून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एक टिप्पर आणि त्यावरील रेती असा एकूण ₹७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून चालकासह वाहनमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पंडीतराव जोगंदड (वय २८, रा. देवठाणा ता. पूर्णा) हा चालक बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास टाटा कंपनीचे टिप्पर (क्र. एमएच ०४ ३५७५) घेऊन धनोरा काळे ते ताडकळस मार्गावर रेतीची अवैध वाहतूक करत होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहनासह अंदाजे तीन ब्रास रेती जप्त केली.
या प्रकरणी पोलिस अंमलदार संदीप रोहीदास साळवे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात संबंधित चालक व अज्ञात मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पडोळे करत आहेत.












