निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी पूर्णा येथे धरणे आंदोलन
वेतन आयोगातील लाभ, महागाई भत्ता व सवलतींच्या मागणीवर ठाम भूमिका
पूर्णा ता.१२(परभणी) : विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे मेन्स फेडरेशनच्या वतीने शुक्रवारी (दि. १०) पूर्णा रेल्वे स्थानकासमोर निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व नांदेड विभागाचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी केले.
या वेळी फेडरेशनतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे मांडण्यात आल्या — आठव्या वेतन आयोगात कार्यरत कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लागू करावेत, कोरोनाकाळात गोठवलेला अठरा महिन्यांचा महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, आंशिक पेन्शन परतफेडीचा कालावधी पंधरा वर्षांवरून बारा वर्षांवर आणावा, तसेच कोरोनाकाळात बंद करण्यात आलेल्या सवलती पुन्हा सुरू कराव्यात. तसेच रेल्वे प्रवासासाठी मिळणारा मोफत पास पुन्हा पूर्वीप्रमाणे हस्तलिखित स्वरूपात देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.
याशिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.या आंदोलनात रिपाइं नेते प्रकाश कांबळे व आय. संजयकुमार यांनी उपस्थित राहून या आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली. आंदोलनात सी.जे. लोंढे, दिलीप इंगोले, गौतम लोभाजी, टी.झेड. कांबळे, ज्ञानोबा जोंधळे, विजयकुमार जोंधळे, सिद्धार्थ भालेराव, सय्यद रहीम, विलास घाते, प्रभाकर त्रिभुवन, शिवाजी थोरात, सुरेश हटकर, मुगाजी खंदारे, मुंजाजी गायकवाड, उत्तम धबाले, एन.जी. विश्वनाथ, यशवंत लोखंडे, विजय बगाटे, मोहन लोखंडे, कासाबाई कांबळे, गीताबाई कापुरे, कल्पना जोंधळे, गंगासागर कापुरे यांच्यासह शेकडो निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.आंदोलन शांततेत पार पडले असून, निवेदन रेल्वे प्रशासनाला देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.












