श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात रोजगार मार्गदर्शन शिबिर
विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील संधींचे मार्गदर्शन.
पूर्णा ता.१२ (प्रतिनिधी): श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालय, पूर्णा येथे पदवी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.ए. ए.नाईक यूनायटेड रॅडीकल टेक्नॉलॉजी प्रा.लि., महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, करिअर मार्गदर्शन कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.या शिबिरात ए. ए. नाईक यूनायटेड रॅडीकल टेक्नॉलॉजीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शहाणे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील रोजगार संधी, बदलते बाजार प्रवाह, नव्या कौशल्यांचे महत्त्व आणि करिअर घडविण्याच्या दिशा याबाबत सखोल माहिती दिली. तर अभिषेक आडे यांनी आधुनिक रोजगार बाजारातील नव्या क्षेत्रांचा अभ्यास सादर करून विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शन कले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार होते. यावेळी डॉ. जे. एस. पुल्ले व डॉ. संजय दळवी मान्यवर म्हणून उपस्थित होते. वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. दिशा मोरे यांनी प्रास्ताविक करताना शिक्षणाबरोबर करिअर मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैशाली देसाई आणि कु. दिव्या देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. स्मिता जमधाडे यांनी केले. या शिबिरात कला, वाणिज्य आणि विज्ञान शिबीरात एकूण ११३ विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांपैकी मोतीराम शिंदे, आदित्य पांचाळ, समीरा आणि गायत्री बुचले यांनी सेमिनारदरम्यान संवाद साधून विचार मांडले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. वैजनाथ ईडोळे आणि श्रीकृष्णा बेटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी डॉ. रवींद्र राख, डॉ. वृषाली आंबटकर, डॉ. सोमनाथ गुंजकर, डॉ. अंबिका चोंढे यांच्यासह कर्मचारी भगुसिंह बायस, कालिदास वैद्य आणि गजानन भालेराव उपस्थित होते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोजगारविषयक जागरूकता, व्यावहारिक दृष्टीकोन आणि कौशल्यविकासाबद्दल नवचैतन्य निर्माण झाले. महाविद्यालयाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील नव्या संधींच्या दाराशी नेणारा हा उपक्रम ठरला.












