बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Spread the love

आष्टी तालुक्यातील बावी दरेवाडी परिसरातील घटना परिसरात भीतीचे सावट.!

आष्टी (प्रतिनिधी) –
आष्टी तालुक्यातील बावी-दरेवाडी परिसरात रविवारी (ता.१२) रात्री उशिरा बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी नेहमीप्रमाणे जनावरांना चारण्यासाठी शेतात गेलेले राजेंद्र विश्वनाथ गोल्हार (वय ३६) हे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी सकाळी घरातून शेताच्या दिशेने गेलेले गोल्हार रात्रीपर्यंत परतले नाहीत. उशीर होत असल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. गावकऱ्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता, बिबट्याच्या हल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. वनविभाग, पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह तब्बल दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. शेवटी गोल्हार यांचा मृतदेह शेतात सापडला, मात्र त्या अवस्थेने सर्वांचेच मन सुन्न झाले.

बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृतदेह विदारक अवस्थेत आढळून आला. शरीराचा एक भाग गायब होता आणि गळ्याला गंभीर जखमा होत्या. हे दृश्य पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक शरद भुतेकर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांच्यासह प्रशासनाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.

वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी सांगितले की, बिबट्याचा वावर लक्षात घेता या परिसरातील १५ गावांत गस्त वाढविण्यात येणार आहे. तसेच, रात्रीचा विद्युत पुरवठा अखंड ठेवण्यासाठी महावितरणशी संपर्क साधण्यात येणार आहे. नागरिकांनी संध्याकाळनंतर एकटे बाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, एक सामान्य शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून ग्रामस्थांना सुरक्षित वातावरण द्यावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

You cannot copy content of this page