रेल्वेखाली सापडून ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

पुर्णा रेल्वे स्थानकावरील घटना; लोहमार्ग पोलीसांत नोंद

पुर्णा, ता.५ (प्रतिनिधी) : जालना येथे उपचारासाठी जाणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (ता.५) रोजी पहाटेच्या सुमारास पुर्णा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर घडली. या घटनेची नोंद पुर्णा लोहमार्ग पोलीसांत करण्यात आली आहे.

आनंद रावसाहेब पारवे (वय ३६, रा. गौर ता. पुर्णा) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, आनंद पारवे हे डोळ्यांच्या उपचारासाठी जालना येथे जाण्यासाठी पहाटेच्या सुमारास पुर्णा रेल्वे स्थानकावर आले होते. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील रेल्वे मार्गाच्या ३११/४३ ते ३११/४५ किलोमीटर अंतरादरम्यान ते कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडले.

या अपघातात त्यांच्या डोक्यासह शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ड्युटीवरील स्टेशन मास्तरांनी तत्काळ पुर्णा लोहमार्ग पोलिसांना कळविले. त्यानंतर फौजदार नेगी, पोलीस कर्मचारी कोंडींबा सातपुते व होमगार्ड प्रकाश वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, गौर येथे आनंद पारवे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयताच्या पश्चात पत्नी, काका-काकु, मुलगा-मुलगी, भाऊ व भावजय असा मोठा परिवार आहे.घटनेचा तपास पो.काॅ कोंडीबा सातपुते हे करत आहेत.

You cannot copy content of this page