परभणी विधानपरिषद निवडणुकीसाठी घोडेबाजार तेजीत
नगरसेवक-जि.प. सदस्य सहलीवर; मताला १० लाखांच्या भावाची चर्चा
पुर्णा, ता.१५ (प्रतिनिधी)
परभणी विधानपरिषद निवडणुकीस अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, तिरंगी लढतीमुळे कथित घोडेबाजाराला मोठे उधाण आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतदारांच्या मतासाठी तब्बल १० लाख रुपयांपर्यंतचा भाव पोहोचल्याच्या चर्चेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याचबरोबर मतदानाचा अधिकार असलेल्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना “सहली”वर पाठवण्यात आल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले आहे.
परभणी विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून या निवडणुकीत एकूण ४६६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत महायुतीकडून सईद खान, महाविकास आघाडीकडून डॉ. विवेक नावंदर, तर अपक्ष म्हणून सुशिल देशमुख यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने सामना अत्यंत रंगतदार बनला आहे.
विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या तुलनेत मतांचा कोठा अपुरा असल्याची चर्चा असतानाही अपक्ष उमेदवार सुशिल देशमुख यांच्या उमेदवारीने समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे बोलले जात आहे. त्यांचे वडील तथा माजी आमदार सुरेश देशमुख हे जिल्ह्यातील मातब्बर राजकीय खेळाडू मानले जात असले तरी मविआचे खा.संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर,आ.राहुल पाटील, पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर,आ.राजेश विटेकर,आ.रत्नाकर गुट्टे,आ.राजेश नवघरे,आ.संतोष बांगर हे नेमके कुणाला साथ देतात, ऐनवेळी कोणती राजकीय खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, सर्वच उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या असून बंद दाराआड बैठकाही पार पडल्या आहेत. रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि मतदारांची कथित ‘व्यवस्था’ यामुळे निवडणुकीभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील विविध पक्षांचे नगराध्यक्ष नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती असे सुमारे १५० ते २०० हून अधिक पदाधिकाऱ्यांना सहलीवर पाठवण्यातआल्याचे बोलले जात असून, या हालचालींमुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी परभणीतील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत असून, अखेर मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे येत्या २२ जुन रोजीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार असल्याने या घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











