श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्रीमद् भागवत कथा व सुराष्ट्र हेतुक महायज्ञ
पूर्णा,ता.५ ( प्रतिनिधी)
पुरुषोत्तम (अधिक) मासानिमित्त श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे दि. २ जून ते ८ जून २०२६ दरम्यान भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, श्रीदाजीगुरु महाराज सेवा मंडळ व श्री सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वेदमूर्ती आचार्य श्री. उमेश महाराज टाकळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक सोहळा संपन्न होत आहे. “अधिकस्य अधिकं फलम्” या उक्तीनुसार अधिक मासात अधिकाधिक पुण्य संचय व्हावा, या उद्देशाने सर्व सद्गुरु भक्त व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सप्ताहभर चालणाऱ्या कार्यक्रमात दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत “सुराष्ट्र हेतुक विशेष महायज्ञ” संपन्न होणार आहे. भारतीय प्राचीन सनातन संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच देशात राजकीय स्थैर्य, सुशासन व समाजकल्याण वृद्धिंगत होण्यासाठी यज्ञ देवतांचे आशीर्वाद लाभावेत, हा या महायज्ञामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
तसेच दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत श्रीमद् भागवत वेदमूर्ती डॉ. श्री.अवधूत उमेश महाराज टाकळीकर हे श्रीमद् भागवत कथेचे निरूपण करणार आहेत संवादिनीवर श्री. मिलिंद जोशी तर तबल्यावर श्री. जीवन पेडगावकर साथसंगत करणार आहेत.यामध्ये नित्य गो-ब्राह्मण पूजन, भागशः ३३ ग्रामस्थ दांपत्य पूजन, आरती तसेच ‘श्रीदाजीगुरुदर्शन’ या चरित्र ग्रंथाचे सामूहिक पारायण आयोजित करण्यात आले आहे.विशेषतः गुरुवार दि. ४ जून रोजी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत ‘श्रीदाजीगुरुदर्शन’ चरित्र ग्रंथाचे सामूहिक पारायण होणार असून, पारायणार्थी भाविकांसाठी ‘भक्ताश्रय’ येथे मुक्कामाची उत्तम व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली.धनगर टाकळी येथे मंगळवार पासून या सोहळ्यास वेदमूर्ती उमेश महाराज यांच्या उपस्थितीत महायज्ञाने सुरुवात झाली असून भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











