चुडाव्यात शिवछत्रपतींचा विनापरवाना पुतळा बसवला;अज्ञातांवर गुन्हा

Spread the love

पूर्णा,ता.१५(प्रतिनिधी)

तालुक्यातील चुडावा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा अनधिकृतरित्या बसविण्यात आल्याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध बुधवार दि. १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयालगत कोणतीही शासकीय पूर्वपरवानगी न घेता हा पुतळा उभारण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

   ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी परसराम राठोड यांच्या फिर्यादीवरून चुडावा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३६/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम २२३, ३२९(३), ३(५) तसेच महाराष्ट्र पुतळ्यांच्या पवित्र भंगास प्रतिबंध अधिनियम १९९७ चे कलम ११ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,(ता.४) मे रोजी मध्यरात्री  अज्ञात व्यक्तींनी मौजे चुडावा येथील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी लोखंडी चबुतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविला. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात चर्चेला उधाण आले.

सार्वजनिक ठिकाणी कोणताही पुतळा उभारण्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी व प्रशासकीय मंजुरी आवश्यक असताना संबंधितांनी कोणतीही अधिकृत प्रक्रिया न राबविता पुतळा उभारल्याने पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सपोनि. सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. मुंडे करीत आहेत.

You cannot copy content of this page