रेल्वेत पादचारी पुलाच्या कामासाठी ‘उज्वला’ गॅसचा अनाधिकृत वापर;पुर्णा पुरवठा विभागाची धाड

Spread the love

पुलाच्या वेल्डिंगसाठी होत होता वापर; सिलेंडर जप्त

पुर्णा, ता. २९ (प्रतिनिधी)

येथिल रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर सुरू असलेल्या रेल्वे पदचारी पुलाच्या कामात घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास गैरवापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता.२९) उघडकीस आला. शासनाच्या ‘उज्ज्वला’ योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना स्वयंपाकासाठी

देण्यात आलेला घरगुती इंडियन गॅस सिलेंडर थेट वेल्डिंगसारख्या व्यावसायिक आणि धोकादायक कामासाठी वापरला जात असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच पूर्णा तालुका पुरवठा अधिकारी सतीश नाईक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तपासादरम्यान रेल्वे पुलाच्या वेल्डिंग कामासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरला जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित सिलेंडर जागेवरून जप्त करण्यात आला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे कंत्राटदार आणि कामगारांमध्ये मोठी धावपळ उडाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. विशेष म्हणजे रेल्वेसारख्या अतिसंवेदनशील परिसरात सुरक्षा नियमांना अक्षरशः हरताळ फासत सुरू असलेला हा प्रकार अत्यंत धोकादायक मानला जात आहे. वेल्डिंगसारख्या कामासाठी औद्योगिक गॅसचा वापर करणे बंधनकारक असताना स्वस्तात काम उरकण्यासाठी घरगुती गॅसचा वापर होत असल्याचे दिसून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, शहरात गॅस आणि इंधन तुटवड्या मुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. गॅससाठी नागरिकांना एजन्सीसमोर तासनतास रांगा लावाव्या लागत असताना दुसरीकडे घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. पूर्णा शहरातील एकमेव गॅस एजन्सीत मोठ्या प्रमाणात गॅसचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असतानाही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

चौकशी करून गुन्हा दाखल होणार”

रेल्वे स्थानकावरील पदचारी पुलाच्या उभारणीच्या कामात वेल्डिंगसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरल्याचे निदर्शनास आले असून संबंधित सिलेंडर जप्त करण्यात आला आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सतीश नाईक, तालुका पुरवठाअधिकारी, पूर्णा

पुर्णेकरांकडून कारवाईची मागणी

घरगुती गॅस सिलिंडरचा वापर येथिल स्थानकावर खाद्यपदार्थ बनवण्यासाठी तसेच धावत्या रेल्वेतील पेन्ट्रीकारमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानकावरील रेल्वे कॅन्टींग मधील होतो त्यासाठी दैनंदिन १० ते १५ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर काळ्याबाजारातुन विकत घेतले जातात. रेल्वेत घरगुती गॅसचा वापर हा नियमभंग असल्याने एखादी घटना घडल्यास गॅस कंपनीकडून मिळणारी विमा सुरक्षा मिळणार नसल्याने संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कॅन्टीग चालका पाठोपाठ आता रेल्वेत काम करणारे खाजगी कंत्राटदारही अनाधिकृत पणे हा गॅस वापरत असल्याने कठोर कारवाई करावी, तसेच घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे

You cannot copy content of this page