पुर्णेत गटशिक्षण अधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम-गरजवंत विद्यार्थिनींना ‘आवडता ड्रेस व फराळाची भेट’

Spread the love

पूर्णा (ता.१५, प्रतिनिधी): दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि आपुलकीचा सण. हा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने पूर्णेतील गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांनी एक आगळावेगळा व स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील गरजवंत विद्यार्थिनींना त्यांच्या आवडीचा ड्रेस व पारंपरिक दिवाळी फराळ देऊन या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य खुलवण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून गटशिक्षण अधिकारी कापसीकर आणि शिक्षण विभागातील सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. यावर्षी देखील हा उपक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती पूर्णा चे गटविकास अधिकारी श्री. मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर मुख्याध्यापिका श्रीमती राऊत, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी मिसाळ म्हणाले, “अडचणी कोणाच्याही प्रगतीच्या आड येऊ शकत नाहीत. शिक्षणाच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करता येते. कस्तुरबा विद्यालयातील मुली हे समाजातील बदलाचे प्रतीक आहेत. शिक्षणच त्यांचे भविष्य उजळवेल.” गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करत, “हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी पूर्णा तालुक्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे स्वेच्छेने दिलेले सहकार्य महत्त्वाचे आहे,” असे सांगून सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटरमण जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल ढाले यांनी मानले.दिवाळीचा खरा आनंद म्हणजे प्रकाश वाटणे — आणि शिक्षण विभाग, पूर्णा यांनी हा प्रकाश गरजवंत विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवत सामाजिक जबाबदारीचे एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.

You cannot copy content of this page