पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा दिवसाढवळ्या घरफोडी.!
आव्हई येथे रोख रकमेसह पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास; आठवड्यातील दुसरी चोरी
पूर्णा, ता.१७ (प्रतिनिधी): पूर्णा तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, आठवडाभरात दोन घरफोड्यांच्या घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. ताज्या घटनेत मौजे आव्हई येथे शुक्रवारी (दि.१७) भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आव्हई येथील शेतकरी ज्ञानोजी नरोजी बुचाले हे आपल्या आई, पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडांसह राहतात. शेती हा त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय असून, सध्या रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे. शुक्रवारी दुपारी सर्व कुटुंबीय शेतीवर गेले होते, तर त्यांचा मुलगा वसमत येथे नातेवाईकांकडे गेला होता. त्यामुळे घर पूर्णपणे रिकामे होते.याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या भिंतीवर चढून छताद्वारे घरात प्रवेश केला. कपाटांचे कुलूप तोडून एक लाख रुपयांची रोकड आणि सुमारे पंचाहत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण १.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
कुटुंबीय शेतावरून परतल्यावर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती पोलीस पाटील संदीप सोनवणे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ पूर्णा पोलीस ठाण्याला कळवून पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले.यानंतर सपोनी सोमनाथ शिंदे, फौजदार आमिर चाऊस, जमादार बंडू राठोड, पोकाॅ. चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पूर्णा पोलीस करत आहेत.
दरम्यान, फक्त आठवडाभरापूर्वी पूर्णा शहरातील अनिल अग्रवाल यांच्या घरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी १ लाख ५५ हजार रुपये आणि सोनं-चांदीचे दागिने पळवले होते. त्या घटनेचा तपास अद्याप सुरू असतानाच आव्हईतील ही दुसरी चोरी झाल्याने पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना व्यक्त होत असून, “चोरट्यांना तातडीने जेरबंद करून वाढत्या घरफोडींवर लगाम घालावा” अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.












