भुकंपाच्या धक्क्याने हिंगोली जिल्हा हादरला.! ३.९ रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद

Spread the love

वसमत, कळमनुरी,औंढा तालुक्यात जाणवले भुकंपाचे धक्के

हिंगोली, दि. २५ (प्रतिनिधी) Earthquake Hingoli District शनिवारी दुपारी ३.३६ वाजता हिंगोली जिल्ह्यातील अनेक भाग थरथरले! वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तीन तालुक्यांत जमिनीने अचानक करवट घेतल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली.रिश्टर स्केलवर ३.९ तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला असून, या धक्क्याचे केंद्र वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ असल्याचे भूगर्भ विभागाने स्पष्ट केले आहे.हिंगोलीकरांनी शनिवारी दुपार अनुभवलेले हे दृश्य क्षणभरासाठी भीतीदायक होते; मात्र सुदैवाने कोणतीही हानी नोंद अद्याप पर्यंत नसल्याचे समजते .

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, सिरळी, गिरगाव, तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, आमदरी आणि कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, पोतरा, सिंदगी, नांदापुर, सोडेगाव, हारवाडी या गावांमध्ये प्रकर्षाने जाणवले. काही ठिकाणी जनावरंही अस्वस्थ दिसली. कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात देखील याच वेळी जमिनीने पुन्हा डोळे उघडले. रामेश्वर तांडा, दांडेगाव, डिग्रस बुद्रुक, सालापुर, कोपरवाडी आणि बोथी या गावांमध्ये नागरिकांनी जमिनीतील हालचाल स्पष्टपणे जाणवली. स्थानिकांनी सांगितले की, काही क्षणांसाठी घराच्या भिंती हलल्यासारख्या झाल्या आणि विजेचे बल्ब डोलू लागले. “आम्ही सर्वजण घराबाहेर पळालो. काही क्षणांतच सर्व शांत झालं, पण मनातील भीती अजूनही कायम आहे,” असे रामेश्वर तांड्याच्या रहिवाशांनी सांगितले.दुपारच्या शांत वेळेत अचानक जमिनीखालून आवाज येताच गावकरी बाहेर पळाले. काही ठिकाणी भिंतींचे किरकोळ तडे गेले, तर भांडी व वस्तू कपाटातून खाली पडल्या. सुदैवाने कोठेही जीवितहानी अथवा मोठे नुकसान झालेले नाही, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

——————————————-

पूर्वीही बसले होते धक्के

गेल्या काही महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात अधूनमधून भूकंपाचे सौम्य झटके बसत आहेत. याच भागात यापूर्वीही भूकंपाचे अनुभव आले होते. त्या वेळी काही घरांचे नुकसान झाले होते, मात्र शासनाने आर्थिक मदत दिली नव्हती, असा नागरिकांचा आरोप आहे.

——————————————- प्रशासनाचे आवाहन“घाबरू नका”

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले की, “भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे होते. कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची नोंद नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी.” तसेच तातडीने सर्व तालुका आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क करण्यात आले असून, भूकंपानंतर भूगर्भातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

You cannot copy content of this page