त्या वीजचोर ठेकेदारापुढे महावितरणने टाकली नांगी..!
लाखोरुपयांची वीज चोरी दडपण्याचा प्रयत्न;अभियंते नेमके कुणाच्या दबावाखाली
पूर्णा,ता.३० (प्रतिनिधी)येथिल नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने कामांसाठी लागणा-या विद्युत पुरवठासाठी चक्क विज चोरीचा प्रकार केल्याचे समोर आले असून, महावितरण विभागाने या प्रकरणात घेतलेली मवाळ भूमिका संशयास्पद ठरत आहे. बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने मागील चार ते पाच महिन्यांपासून हा ठेकेदार थेट विज वाहिनीवर अकोडा टाकून लाखों रुपयांची विज चोरी करत आला आहे. मात्र महावितरणने केवळ थातुरमातुर दंडात्मक कारवाई करून प्रकरणावर पडदा टाकल्याने महावितरण कंपनीच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
पुर्णा शहरातील पालीकेच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात नव्या पाणी पुरवठा योजनेसाठी सुरू असलेल्या टाकी बांधकामास वापरल्या जाणाऱ्या यंत्रांसाठी (३ एच.पी.मोटार,व्हायब्रेटर, मिक्सर, ड्रिल मशीन) थेट विजवाहिनीवर अकोडा टाकण्यात आला होता. गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून सुरू असलेल्या या विज चोरीबाबत महावितरण अधिकाऱ्यांना माहिती नव्हती का.?की याकडे दुर्लक्ष केले गेले.? विज चोरीचे पुरावे हाती लागल्यानंतरही गुन्हा दाखल न करता थातुरमातुर पद्धतीने फक्त दंड आकारण्यात आला. सामान्य नागरिकाने विज चोरी केली असती, तर तुरुंगात टाकले असते; पण नगरपरिषदेच्या कंत्राटदाराला मोकळीक का? असा थेट सवाल शहरातील नागरिक विचारत आहेत.
सदर कंत्राटदार हा एका प्रभावी लोकप्रतिनिधीचा निकटवर्तीय असल्याची चर्चा असून, त्याच्या दबावामुळेच महावितरण अधिकारी मौन बाळगत असल्याचा आरोप होत आहे. घटनेनंतर या प्रकरणी माध्यमातून वृत्त प्रकाशित होताच गुरुवारी(ता.३०) रोजी नांदेड येथील मुख्य अभियंता हे पूर्णा येथे येऊन गेले, त्यांच्या कडून कारवाई अपेक्षित होती परंतु या प्रकरणावर त्यांनीही कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे “हे प्रकरण दबावाखाली गाडले जात आहे का?” असा संशय अधिक गडद होत आहे.याच कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे काही महिन्यांपूर्वी दहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला होता.आता पुन्हा विज चोरीचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक होतो आहे.
महावितरणच्या या दुजाभावपूर्ण भूमिकेविरोधात काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी मुंबई येथील’प्रकाशगडावर’व्यस्थापकीय संचालकांना, तसेच छ.संभाजीनगर येथील विभागीय सहा.संचालक यांना संबंधित प्रकरणी भेट घेऊन निवेदन देणार आहेत. महावितरण सामान्य ग्राहकांवर कठोर कारवाई करत असताना, प्रभावशाली लोकांसमोर गप्प का राहते, असा सवाल आता जनतेने उपस्थित केला आहे.
“विज चोरी ही गुन्हा आहे — मग अधिकार्यांचे मौन कोणत्या भीतीने?” असा रोष नागरिकांनी व्यक्त केला असून, या प्रकरणात तातडीने कंत्राटदार आणि संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.पूर्णा शहरात या प्रकरणाची चर्चा चहाटळ्यांपासून सोशल मीडियापर्यंत रंगली आहे. एकीकडे सरकार ‘स्मार्ट सिटी’चा नारा देत असताना, दुसरीकडे विज चोरीसारखे प्रकार आणि अधिकारी वर्गाचे मौन हे शासन व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करणारे ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.












