पूर्णा पालीकेला लुटणाऱ्या भ्रष्ट टोळीला जनता धडा शिकवेल – मा.आ. बाबाजानी दुर्राणी

Spread the love

पुर्णेत पालीका निवडणुकीच्या अनुषंगाने पार पडली काँग्रेसची बैठक

पूर्णा, ता. ६ (प्रतिनिधी)  मागील काही वर्षांपासून पूर्णा नगरपरिषदेत विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. काही टोळक्यांनी निधीची लूट करून सत्तेचा गैरवापर केला असून, शहराचा विकास थांबवला आहे. या लुटारू टोळीला जनता आगामी निवडणुकीत धडा शिकवेल आणि प्रामाणिकपणे नागरिकांसाठी काम करणाऱ्यांचीच सत्ता येईल,अशी जोरदार टिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आ. बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले.

       पुर्णा शहरात गुरुवारी (ता.६) रोजी  शहराध्यक्ष अहमद भाई यांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणनीती ठरवण्यात आली. या बैठकीला नागसेन बेरजे, अमोल जाधव, अतिकुल रहमान, हनुमंतराव डाके, शंकरराव पुंडगे, व्यंकटेश काळे, रंगनाथ भालेराव, शहराध्यक्ष अहमद भाई, तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे, निखिल धामणगावे, पांडुरंग कदम, सलीम भाई, रफिक सर, चंपतराव मोहिते, विष्णू चापके, ईलियास भाई, सदाशिव वाटोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      पुढे बोलताना दुर्राणी म्हणाले की, आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून, समविचारी पक्षांसोबत युती करून या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. तरुण आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्यावर पक्षाचा विशेष भर असणार आहे. वंचित,रासप, उबाठा आणि शरद पवार गट या पक्षांसोबत युतीसाठी चर्चा सुरू असल्याचे सांगीतले.मित्र पक्षांसोबत एकत्रितपणे लढत देण्याचा आणि नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी ‘गाव तेथे शाखा, शाखा तिथे पदाधिकारी-कार्यकर्ते’ ही मोहीम राबवण्याची घोषणा करण्यात आली. प्रत्येक गावात काँग्रेसची शाखा स्थापन करून कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष ताकदीने लढवेल आणि जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकेल, असा निर्धार मा.आ. दुर्राणी यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page