बळीराजा कारखान्या कडून ऊसाला २ हजार ९५० रु. हमीभाव जाहीर!

Spread the love

३२ दिवसांत दिड लाख मे.टन उच्चांकी  गाळप; चेअरमन शिवाजीराव जाधव यांची माहिती. पूर्णा,ता.९(प्रतिनिधी) येथिल पुर्णा बळीराजा साखर कारखाना लि. कानडखेड येथे गळीत हंगाम २०२५-२६ ला सुरुवात झाल्यानंतर केवळ ३२ दिवसांत तब्बल १ लाख ५५ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कारखाना व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यां साठी प्रति मेट्रिक टन २९५० रुपयांचा हमीभाव जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.यंदाच्या हंगामात एकूण ११ हजार,२५६ हेक्टर ऊसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली. गाळपाची चांगली गती आणि दररोज वाढत असलेला ऊस पुरवठा लक्षात घेता कारखाना प्रशासनाने ऊसदराची स्पष्ट घोषणा करत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे .हमीभावाची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार असून पहिल्या हफ्त्यात २५०० रुपये प्रति मेट्रिक टन उचल रक्कम देण्यात येणार आहे. दुसरा हप्ता जून महिन्यात ३०० रुपये तर तिसरा हप्ता दीपावली पूर्वी १५० रुपये प्रति मेट्रिक टन देण्यात येईल. याशिवाय शासनाच्या एफआरपी धोरणानुसार तसेच साखर उताऱ्यानुसार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न राहील, असे कारखाना व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

     कारखान्याने या हंगामासाठी ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी सर्व विभाग तयारीत आहेत. गाळपासाठी शेतकऱ्यांनी घाई न करता आपला ऊस बळीराजा कारखान्या कडेच द्यावा, असे आवाहनही करण्यात आले. सभासदांचा ऊस पूर्ण झाल्यानंतर बिगर सभासदांचाही ऊस गाळपासाठी स्वीकारला जाईल आणि कार्यक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक ठेवला जाणार नाही, असे कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव व कार्यकारी संचालक अजय शिवाजीराव जाधव यांनी सांगितले.

You cannot copy content of this page