परभणीत आज महापौर व उपमहापौर निवड
खुल्या प्रवर्गातून महापौर पदाची निवड; आघाडीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता
परभणी,ता.११ ( प्रतिनिधी)
परभणी शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज गुरुवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता बी. रघुनाथ सभागृहात विशेष बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.
महानगरपालिकेची नुकतीच झालेली सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी १२ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस ११ जागा, जनसुराज्यशक्ती ३, यशवंत सेना १ आणि १ अपक्ष सदस्य निवडून आले आहेत.
शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांनी निवडणूकपूर्व आघाडी केली होती. या आघाडीला एकूण ३७ जागा मिळाल्या आहेत. ६५ सदस्यीय सभागृहात बहुमतासाठी ३३ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे महापौरपद आघाडीच्याच वाट्याला जाण्याची शक्यता आहे. शिवसेना (उबाठा) कडून सय्यद समी उर्फ माजू लाला आणि सय्यद इकबाल सय्यद यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसकडूनही काही इच्छुक पुढे आले आहेत.
महापौर पदासाठी १४ आणि उपमहापौर पदासाठी ७ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. बैठकीत प्रथम अर्जांची छाननी होईल. त्यानंतर इच्छुकांना अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिला जाईल. अंतिम उमेदवारांची नावे जाहीर करून हात वर करून मतदान घेतले जाणार आहे.दरम्यान, महापौर निवडीपूर्वी शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक परभणीबाहेर हलविण्यात आले होते. फूट पडू नये म्हणून ही खबरदारी घेतल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत गेले होते, तर काँग्रेसचे नगरसेवक हैदराबाद येथे असल्याची माहिती आहे. हे सर्व नगरसेवक थेट आजच्या बैठकीसाठी परभणीत येणार असल्याचे सांगितले जात आहे.उदाच्या बैठकीत कोणाच्या गळ्यात महापौर आणि उपमहापौरपदाची माळ पडते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.











