विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाची धाड; मानवत तालुक्यामध्ये १२ लाखांचा गुटखा जप्त
दोन जणांवर गुन्हा नोंद; अवैध धंद्याविरोधात पोलिसांची कडक भूमिका
मानवत, ता. १६ (प्रतिनिधी): विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड परीक्षेत्राच्या पथकाने मानवत पोलिसांच्या सहकार्याने तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध गुटखा वाहतूक उघडकीस आणली. हत्तलवाडी परिसरात अडविण्यात आलेल्या मालवाहू वाहनातून सुमारे १२ लाख ३७ हजार ५८४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार (दि. १५ फेब्रुवारी) रोजी मध्यरात्री विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचत ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे छोटा हत्ती वाहनातून पाळोदी रोडच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गुटखा वाहतूक होत असल्याचे समजताच पोलिसांनी तत्काळ हालचाल केली.
ग्रेड पोलिस उपनिरीक्षक नारायण शंकरराव घोरपडे (वय ५६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गस्तीदरम्यान महाराणा प्रताप चौक येथे विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाचे अधिकारी एस. बी. माचेवाड व त्यांचे सहकारी पथक भेटले. त्यानंतर संयुक्तपणे कारवाईची आखणी करण्यात आली. पहाटे साधारण २ वाजताच्या सुमारास मौजे हत्तलवाडी येथे संशयित वाहन (क्र. एमएच २२ एएन ३५१३) थांबवून तपासण्यात आले.
दोन पंचांच्या उपस्थितीत वाहनाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा सापडला. पोलिसांनी वाहनासह एकूण १२ लाख ३७ हजार ५८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वाहन चालक सर्जेराव प्रल्हादराव शिंदे (वय ४६, रा. हत्तलवाडी, ता. मानवत) याला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्याने हा माल पाथरी येथील पठाण गल्लीतील आवेज खान याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. या प्रकरणी सर्जेराव शिंदे व आवेज खान या दोघांविरुद्ध मानवत पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी गुटखा पथकाचे सपोनि बोरकर करीत आहेत. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.











