छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरण; बोरी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा

Spread the love

बाजारपेठ कडकडीत बंद; गुन्हे मागे घेण्याची आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी

बोरी/प्रतिनिधी :
येथे शिवजयंतीनिमित्त गुरुवारी रात्री शिवप्रेमी नागरिकांच्या पुढाकारातून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने नागरिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची व धक्काबुकीची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी तब्बल ४६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी बोरी व परिसरातील नागरिकांनी शनिवारी (दि.२१) बोरी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनामध्ये पोलीस बीट जमादार दिलावर खान पठाण यांना निलंबित करावे तसेच दाखल केलेला चुकीचा एफआयआर तात्काळ रद्द करावा, अशी ठोस मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारी पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

या आंदोलनात बोरीसह परिसरातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.दरम्यान, पोलिसांच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत बोरी येथील व्यापाऱ्यांनी शनिवारी दिवसभर आपली दुकाने व आस्थापने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.

You cannot copy content of this page