होमगार्ड कार्यालयातील तिघांना एसीबीने पकडले

Spread the love

पदोन्नतीसाठी मागीतली होती २५ हजार रुपयांची लाच; परभणीच्या नानलपेठ पोलीसांत गुन्हा दाखल

परभणी,ता.२४(प्रतिनिधी)

पदोन्नती देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी परभणीतील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी (दि. २३) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराला ३१ डिसेंबर २०२५ रोजी फलटणनायक पदावर पदोन्नती मिळाली होती. मात्र, या पदोन्नतीसाठी ‘बक्षीस’ म्हणून २५ हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याची तक्रार २० फेब्रुवारी रोजी एसीबीकडे करण्यात आली. या तक्रारीनंतर एसीबीने पडताळणी केली असता संबंधितांनी २५ हजारांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी ८ हजार रुपये आधीच ऑनलाईन स्वीकारल्याचेही उघड झाले.उर्वरित रकमेवर तडजोड करून १२ हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम वरिष्ठ फलटण नायक ज्ञानोबा लटपटे यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार २३ फेब्रुवारी रोजी जिंतूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारताच लटपटे यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात केंद्रनायक नानासाहेब मोखडे, प्रशासकीय अधिकारी माणिक वाडेकर आणि वरिष्ठ फलटण नायक ज्ञानोबा लटपटे या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाईदरम्यान आरोपींकडून मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून मोबाईलची तपासणी सुरू आहे. तसेच घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली आणि उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

You cannot copy content of this page