परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर
– १८ मार्चला विशेष सभा; पिठासीन अधिकारी म्हणून शोभा जाधव नियुक्त
परभणी,ता.२८ | प्रतिनिधी :
परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीसाठी १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शोभा जाधव भूषविणार आहेत. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.२७) प्रसिद्ध केले.
सन २०२२ मध्ये परभणी जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर काही काळ प्रशासकांकडे कारभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पाडल्या. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड करण्यासाठी ही विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती) आणि पंचायत समिती (सभापती व उपसभापती पदांच्या आरक्षण व निवडणूक) नियम १९६२ मधील तरतुदीनुसार ही प्रक्रिया पार पडणार आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर भारतीय जनता पक्षाने दावा सांगितला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र प्रत्यक्ष निवड प्रक्रियेनंतरच अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर कोणाची निवड होते, हे स्पष्ट होणार आहे.
१० मार्चला ठरणार पंचायत समितीचे सभापती उपसभापती
जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायत समित्यांची निवडणूक नुकतीच पार पडला. त्यानुसार जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून येत्या १० मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती निवडीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत











