पुर्णा उपविभागीय पोलीस कार्यालयाला मिळाली नवी फॉरेन्सिक व्हॅन

Spread the love

डि.वाय.एस.पी डॉ. समाधान पाटील यांच्या हस्ते लोकार्पण;पुर्णा, पालम व चुडावा हद्दीत करणार काम

पुर्णा,ता.६( प्रतिनिधी);

गुन्ह्यांचा तपास अधिक अचूक, वैज्ञानिक आणि परिणामकारक करण्यासाठी पुर्णा उपविभागीय पोलीस कार्यालयाला अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन मिळाली आहे. या नव्या सुसज्ज एसी फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण गुरुवारी (दि.५) रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या व्हॅनमध्ये आठ जणांचे विशेष पथक कार्यरत राहणार असून पुर्णा, पालम आणि चुडावा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी तिचा उपयोग होणार आहे.

oplus_131072

लोकार्पण कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, फौजदार वडजे, पोहेकाॅ. रमाकांत बबीलवार, पोहेकाॅ. दशरथे, पो.काॅ. पांडुरंग वाघ, पो.काॅ. बायनेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना डॉ. समाधान पाटील यांनी सांगितले की, अनेक प्रकरणांमध्ये योग्य पुराव्याअभावी आरोपी सुटताना दिसतात. मात्र या अत्याधुनिक फॉरेन्सिक किट आणि उपकरणांच्या मदतीने घटनास्थळीच प्राथमिक तसेच अंतिम निष्कर्ष काढणे शक्य होणार आहे. या व्हॅनमध्ये विविध वैज्ञानिक उपकरणे उपलब्ध असून त्यातून गोळा होणारे पुरावे ब्लॉकचेन पद्धतीने सुरक्षित साठवले जाणार आहेत. त्यामुळे कोणालाही पुराव्यांमध्ये छेडछाड करता येणार नाही.या फॉरेन्सिक व्हॅनमध्ये सीसीटीव्ही प्रणाली तसेच पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रीजची सुविधा आहे. त्यामुळे रक्त नमुने, डीएनए नमुने, केमिकल्स आणि इतर पुरावे योग्य तापमानात सुरक्षित ठेवता येतील. तसेच सर्व प्रक्रिया सीसीटीव्हीच्या माध्यमातून नोंदवली जाणार असल्याने पारदर्शकता राखली जाईल.

डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले की, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सीमेन कलेक्शन, रक्त नमुने किंवा डीएनए तपासणीसाठी आवश्यक नमुने या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून घटनास्थळीच वैज्ञानिक पद्धतीने गोळा करता येणार आहेत. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास जलद होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल.या व्हॅनमुळे पुर्णा, पालम आणि चुडावा परिसरातील गुन्ह्यांच्या तपासात वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित तपास वाढेल आणि गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होईल, असा विश्वासही डॉ. समाधान पाटील यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page