Hingoliजिल्ह्यात अवैध धंदे थारा नाही: डॉ.श्रेणिक लोढा
हिंगोली पोलिस अधीक्षक कार्यालयात नुतन अधिक्षकांनी घेतली आढावा बैठक; प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्याचे निर्देश
हिंगोली, ता. १३ (प्रतिनिधी) :
जिल्ह्यातील अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. अवैध धंदे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असा स्पष्ट इशारा नुतन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.श्रेणिक लोढा यांनी दिला.
हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात लोढा यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व १३ पोलिस ठाण्यांसह विविध शाखांच्या अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करून त्यांचा निपटारा करण्याचे निर्देश अधीक्षक डॉ. लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कामकाजात आवश्यक सुधारणा करून तपासाची गुणवत्ता वाढवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या श्रावणमास सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.जिल्ह्यातील कोणत्याही भागात अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल. अशा ठिकाणी कारवाईबाबत पुढील आढावा बैठकीत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.बैठकीस अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गृह पोलिस उपअधीक्षक हरीश गवळी, वसमत उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, हिंगोली शहर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण देशमुख, हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश वाघ यांच्यासह विविध शाखांचे अधिकारी आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी उपस्थित होते.











