हिंगोलीत चोरट्यांकडून ATM फोडण्याचा प्रयत्न
शिवाजीनगरातील भररस्त्यावरच्या एसबीआय एटीएमला लक्ष्य; सीसीटीव्हीत चेहरा झाकलेला संशयित कैद
हिंगोली, ता. १३ (प्रतिनिधी) :
शहरात घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांनंतर आता चोरट्यांनी एटीएम केंद्रांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी( ता.१३) रोजी सकाळी उघडकीस आली.भररस्त्यावर असलेल्या एटीएम केंद्रात चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एटीएम मशीन फोडण्याच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले.पोलिसांनी परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता चेहरा झाकलेल्या अवस्थेतील एक संशयित व्यक्ती दिसून आली. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.या प्रकरणी एटीएम व्यवस्थापक मंदार बाजीराव कळसकर, रा. एनटीसी हिंगोली, यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात कारवाईची प्रक्रिया सुरू होती.शहरात अलीकडच्या काळात घरफोडी व वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर आता चोरट्यांनी एटीएमकडे मोर्चा वळवल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.











