पूर्णा शहरात रोडरोमिओंचा सुळसुळाट!
शैक्षणिक संकुल परिसरात टवाळखोरांचा उच्छाद; पोलीसांचे साफ दुर्लक्ष, चिडीमार-दामिनी पथक बेपत्ता; विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर
पूर्णा, ता. १६ (प्रतिनिधी) :
पूर्णा शहरातील आनंदनगर, आदर्श कॉलनी, अलंकारनगर, मुख्य रस्ता तसेच खासगी शिकवणी व शैक्षणिक संकुल परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट झाला आहे. शाळा-महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असताना स्थानिक पोलिसांकडून मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मुलींच्या सुरक्षेसाठी असलेले चिडीमार पथक आणि दामिनी पथक प्रत्यक्षात कुठे आहे? असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
मागील काही महिन्यांपासून शहरातील शैक्षणिक परिसरात टवाळखोर तरुणांचा उच्छाद वाढला आहे. दुचाकीवरून तीन-तीन जण बसून भरधाव फिरणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, खुलेआम छेड काढणे, अश्लील शेरेबाजी करणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याची तक्रार आहे. काही अल्पवयीन मुले तर कोणतीही पर्वा न करता दुचाकी चालविताना दिसत असून, त्यांच्या बेदरकार वाहनचालकामुळे विद्यार्थिनींसह इतर नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या रोडरोमिओंना लगाम घालण्यासाठी पोलिसांन प्रत्यक्ष कारवाईची ‘चपराक’ दाखवावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पोलिसांचा धाकच उरला नाही!
शहरात पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी नसल्याने रोडरोमिओंचे चांगलेच फावले आहे. शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवणी सुटण्याच्या वेळेत पोलिसांची विशेष गस्त असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र टवाळखोरांचेच साम्राज्य असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलींना शिक्षणासाठी पाठविताना चिंतेत आहेत.
चिडीमार-दामिनी पथक नेमके करते तरी काय?
महिलांच्या आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी चिडीमार व दामिनी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, पूर्णा शहरातील वाढत्या रोडरोमिओगिरीवरून ही पथके कागदावरच सक्रिय आहेत की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच पोलिसांना जाग येणार का, असा संतप्त सवालही पालकांकडून केला जात आहे.
घटना घडण्याची वाट पाहू नका!
विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष कायम ठेवणे गंभीर बाब आहे. रोडरोमिओंवर वेळीच कारवाई न झाल्यास त्यांचे धाडस आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शैक्षणिक संकुल परिसरात नियमित पोलीस गस्त, साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती, अल्पवयीनांकडून होणाऱ्या बेदरकार वाहनचालकांवर कारवाई तसेच छेडछाडीच्या प्रकारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.











