स्था.गु.शाखेच्या विशेष पथकाने पकडला २ लाख ७९ हजारांचा गुटखा

Spread the love

पूर्णा तालुक्यातील खडाळा गावाजवळ पांदण रस्त्यावर कारवाई; गुटखा-पानमसाल्यासह ४ लाखांची विना नंबर कार जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा

पूर्णा, ता. १५ (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व जाफरानी जर्द्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली. ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडाळा गावाजवळील पांदण रस्त्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत २ लाख ७९ हजार ४०८ रुपयांचा गुटखा  व ४ लाख किंमतीची कार असा ६ लाख ७९ हजार ४०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सिल्व्हर रंगाची कार जप्त करण्यात आली आहे. मात्र, कारमधील दोघे आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

      जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या आदेशाने पोहेकॉ. दिपक अंजया मुदीराज, पोहेकॉ. रवि जाधव, पोहेकॉ. यशवंत वाघमारे, पोशि. शरद सावंत व पोशि. नामदेव धोत्रे हे शुक्रवारी (ता.१४) रोजी रात्री ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यां विरोधात कारवाईसाठी गस्त घालत होते. लोहगाव बसस्थानक परिसरात ताडकळस पोलीस ठाण्याचे रात्रगस्त तपासणी करणारे अंमलदार सपोउपनि. सुजलोड व चालक पोशि. हिवरे यांचीही पथकाला भेट झाली.

याचदरम्यान गुप्त बातमीदारामार्फत ताडकळसकडून खडाळा पाटीकडे विनानंबरची सिल्व्हर रंगाची कार येत असून, त्यामध्ये पदमाकर उर्फ बाळू गोविंदराव शिंदे (रा. खडाळा, ता. पूर्णा) व त्याचा साथीदार शेख असलम शेख गौस (रा. पूर्णा) हे गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेत खडाळा गावाच्या अलीकडे ताडकळस-सिंगणापूर रस्त्यावरील पांदण रस्त्यावर सापळा रचला.दरम्यान  रात्री सुमारे १२.३० वाजता विनानंबरची सिल्व्हर रंगाची कार येताना दिसली. पोलिसांनी कारचालकास थांबण्याचा इशारा केला; मात्र चालकाने कार न थांबवता पुढे नेली. पोलिसांनी खासगी वाहनाने तिचा पाठलाग केला असता कार रस्त्याच्या कडेला थांबवून चालक व त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेले. त्यानंतर पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता विविध पोत्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, तंबाखू व जाफरानी जर्दा आढळून आला.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये केसरयुक्त विमल पानमसाला,राजनिवास गुटखा,झेड वन-०१, व्हि.आय तंबाखू असा २ लाख ७९ हजार ४०८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू तसेच गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ४ लाख रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीची सिल्व्हर रंगाची जुनी कार, असा एकूण ६ लाख ७९ हजार ४०८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.या प्रकरणी फिर्यादी पोहेकॉ. दिपक अंजया मुदीराज यांच्या फिर्यादीवरून आरोपी पदमाकर उर्फ बाळू गोविंदराव शिंदे व शेख असलम शेख गौस यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २७४, २७५, २२३, २८८ तसेच अन्न व सुरक्षा मानके अधिनियमातील कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास ताडकळस पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page