उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा

Spread the love

इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर ३० ऑगस्टला भव्य सभा;खा.संजय जाधव यांची माहिती

परभणी, ता. २२ (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे यांचा येत्या ३० ऑगस्ट रोजी परभणी दौरा निश्चित झाला असून, त्यांच्या उपस्थितीत शहरात भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे शेतकरी, शिवसैनिक आणि विविध क्षेत्रातील नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. रखडलेली विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाबाबतही ते भूमिका मांडणार असल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी दिली.
परभणी शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार जाधव यांनी या दौऱ्याची माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, महानगरप्रमुख आनंद भरोसे,माणिक पौंढे, काशिनाथ काळबांडे, रितेश काळे, पांडुरंग खिल्लारे तसेच बाळासाहेब पानपट्टे यांची उपस्थिती होती.यावेळी खा. जाधव म्हणाले की, संवाद मेळाव्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेणार आहेत. या मेळाव्यासाठी वीस ते पंचवीस हजार शेतकरी उपस्थित राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी, डॉक्टर, वकील आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिकांशी संवाद साधण्यासाठीही उपमुख्यमंत्री शिंदे यांचा वेळ निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील अनेक महत्त्वाची विकासकामे अद्याप प्रलंबित असून, या कामांना गती देण्यासोबतच नव्या विकास योजनांना मंजुरी मिळवून देण्यासाठी या दौऱ्याचा उपयोग केला जाणार असल्याचे खा. जाधव यांनी स्पष्ट केले.

जाधव यांच्या प्रवेशानंतर शिंदेंची पहिली मोठी सभा

खा. संजय जाधव यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परभणीतील ही पहिली मोठी सभा ठरणार आहे. त्यामुळे या मेळाव्याला केवळ शेतकरी संवादाचे स्वरूप न राहता, जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांची नांदी मानली जात आहे.

अनेक दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश?

शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) गटातील काही आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही मोठे राजकीय चेहरे शिवबंधन हाती घेतील, अशी चर्चा सुरू आहे.

You cannot copy content of this page