पाथरी अपहरणातील एक आरोपी ताब्यात
४ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल उकळला
पाथरी/प्रतिनिधी
शहरातील सू रेस्ट हाऊस परिसरात फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला अडवून जबरदस्तीने वाहनात बसवून नेल्याचा आणि त्याच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १४०(३), ३०९(६), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणातील फिर्यादी पुरुषोत्तम गंगाभिषण सोमाणी (वय ५८ वर्षे), व्यवसायाने व्यापारी असून ते पाथरी तालुक्यातील एकता नगर परिसरात राहतात. फिर्यादी हे कर्जाच्या कामासंदर्भात मुथूट फायनान्स येथे जात असताना त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून संशयितांनी त्यांना अडविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा वाहनातून आलेल्या व्यक्तींनी फिर्यादींना जबरदस्तीने वाहनात बसवून लोहा येथे नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेथे आरोपींनी फिर्यादींकडे पैशांची मागणी केली. त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच सोन्याच्या दोन अंगठ्या काढून घेतल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादीच्या पत्नीला फोन करून ९० हजार रुपये फोन-पेवर पाठविण्यास भाग पाडले.
या घटनेत रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने मिळून एकूण ४ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल गेल्याचे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात रंगनाथ भुरे, महादू महागावकर आणि आणखी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी यापैकी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार करीत आहेत. घटनेत वापरण्यात आलेले वाहन, आरोपींची भूमिका, पैशांच्या व्यवहाराचे पुरावे, फोन-पे व्यवहार तसेच फिर्यादीकडून नेण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.











