बोरीत घरफोडीचा एक तर चोरीचे चार गुन्हे उघड;तीघे जेरबंद
३ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त*
जिंतूर (बोरी)/प्रतिनिधी
बोरी पोलीसांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना घडल्या होत्या. तेव्हापासूनच पोलीस स्टेशनचे सहायक पोलिय निरिक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड व एस. एन. थोरवे यांनी तपास कार्य हाती घेतले होते. शुक्रवारी (दि. २१)डीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, दशरथसिंग उर्फ कोंड्या बादलसिंग जुन्नी (फरार), ओमकारसिंग उर्फ रफ्तार रूपसिंग बावरी (वय २०) व सेवकसिंग उर्फ कान्हासिंग रेड्डीसिंग बावरी (वय २०), रा. झरी, ता. जि. परभणी यांनी बोरी येथील दुकान फोडले असून ते चोरीच्या उद्देशाने कोक पाटी परिसरात इलेक्ट्रिक ऑटोने आले आहेत. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने तातडीने सापळा रचून ओमकारसिंग बावरी व सेवकसिंग बावरी या दोघांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ९७ हजार रुपये रोख रक्कम तसेच तीन लाख रुपये किमतीचा नवीन इलेक्ट्रिक ऑटो असा एकूण ३ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला.
या आरोपींनी मौजे आसेगाव, गुळखंड, बोरी येथील बसस्थानक परिसरातील किराणा दुकान व कृषी केंद्र फोडल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी अभिलेख तपासले असता गु.र.नं. १३४/२०२५, ०२/२०२६, ७२/२०२६ व १४४/२०२६ हे बीएनएस कलम ३०३(२) अन्वये चोरीचे चार गुन्हे, तसेच गु.र.नं. २०६/२०२६ हा बीएनएस कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये घरफोडीचा गुन्हा असे एकूण पाच गुन्हे निष्पन्न झाले. यापैकी पहिल्या चार गुन्ह्यांमध्ये यापूर्वी ‘अ’ फायनल अहवाल पाठविण्यात आला होता. बोरी व परिसरातील महत्त्वाचे गुन्हे या कारवाईत उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनात तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलिय निरिक्षक रामेश्वर धोंडगे, पोलिस उपनिरिक्षक महादेव गायकवाड, पोलिल उपनिरिक्षक सोपान थोरवे, पोलिस हवालदार राजेश जठाळ, पोलिस हवालदार अमोल मुंढे, पोलिस अंमलदार संघसेन कांबळे, रामप्रसाद कोकाटे व महिला पोलिस अंमलदार फरीन रंगरेज यांचा सहभाग होता.











