परभणीत महावितरणच्या फिडरला लागली आग
अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत
परभणी/प्रतिनिधी
शहरातील महावितरणच्या दर्गा रोड परिसरातील फिडरला शुक्रवारी(दि. २१)सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण फीडर आगीच्या भक्षस्थानी आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन वाहनास फिडर परिसरात जाता येत नसल्याने काही काळ पथकास मोठी कसरत करावी लागली. मात्र थोड्याच अवधीत पथकाने आग विझविण्यास सुरुवात करून आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन अधिकारी ज्ञानेश्वर राठोड यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन जवान दीपक कानडे, गौरव देशमुख, सर्जेराव मुंडे, वाहनचालक संतोष मुदिराज व शेख सरवर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, आगीचे लोळ दिसताच परिसरातील नागरिकांनी फिडर परिसरात एकच गर्दी केली.
-दर्गारोड पेडगाव रोड परिसरात लाईट गुल
आगीच्या या घटनेमुळे फिडरवरील दर्गारोड परिसरातील अनेक वसाहती तसेच जुना पेडगाव रस्ता परिसरातील अनेक वसाहतींचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या वतीने आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या फिडरच्या दिरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून युद्ध पातळीवर काम सुरू आहे.











